मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याने पाच वर्षीय बालिका गंभीर

प्रतिनिधी/विकास मेहता

माहूर : शहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्याच्या संख्येत भर पडत आहे. दि. २० एप्रिल रोजी स.८-३० च्या सुमारास शहरातील वॉर्ड क्र. ७ मधील भोजंती तलाव परिसरात कुत्र्याच्या कळपाने वेदिका गुरूदास राठोड या ५ वर्षीय बालिकेवर हल्ला करून तिच्या कानाला व मानेच्या पाठीमागील भागास जबर चावा घेतला. चावा घेतल्यानंतर तिला फरफटत नेल्याची घटना घडली आहे.
ही घटना पाहून आनंदा तिवसकर यांनी तिला कुत्र्याच्या तावडीतून सोडवून घरी पोहचविले. आई वडिलांनी तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉ. उदय काण्णव यांनी प्राथमिक उपचार करून जखमअधिक गंभीर असल्याने वेदिका हिस पुढील उपचाराकरीता यवतमाळ येथे पाठविले.
याच परिसरात प्राथमिक शाळा आहे, तिथे लहान लहान मुले शिक्षणासाठी येतात. नेमक्या त्याच ठिकाणी मोकाट कुत्र्याचा एक कळप दिवसरात्र ठाण मांडून असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे परिसरातील नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाकडे केली आहे. यापूर्वीही मोकाट कुत्र्याने लहान बालकांसह वयोवृद्ध नागरिकांना चावा घेतल्याच्या अनेक गंभीर घटना घडल्या आहेत. नगर प्रशासनाने उचित कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *