प्रतिनिधी/विकास मेहता
श्रीक्षेत्र माहूर : तालुक्यातील वाई बाजार येथील विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या लोकांना कुळ हक्काने म्हणजेच भोगवटादार वर्ग-२ ची जमीन कास्त करण्यासाठी मिळाली होती. परंतु सदरची जमीन व्यापारी लोकांना विक्री करून भ्रष्टाचार केले असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ता साजीद खान यांनी तक्रारीद्वारे केला आहे. त्यानुषंगाने या प्रकरणाची चौकशी करून स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे लिखित आदेश अप्पर जिल्हाधिकारी नांदेड यांनी किनवटच्या सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले यांना दि. २७ एप्रिल रोजी दिले आहेत. त्यांच्या निर्णयाकडे तालुकावासियांचे लक्ष लागले आहे.
वाई बा. येथील गट क्र. २६६, २६७ व २६८ ही जमीन विमुक्त आणि भटक्या जमातीच्या लोकांना कसून खाण्यासाठी मिळाली
होती. गावठाणाला लागून असलेल्या त्या जमीनीची नोंद सिटीसर्व्हे मध्ये सुद्धा आहे. ज्याचे बाजार मूल्य करोडो रुपयात आहे. दि. ३० एप्रील २०१५ च्या शासन निर्णयानुसार तशा जमीनी विक्री परवानगी देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांनाच आहेत.
परंतु कपोलकल्पीत खरेदीदार निश्चित करून कुळाची ती जमीन विक्री करण्यासाठी परवानगीची गरज नसल्याचे आदेश स्थानिक प्रशासनाकडून दि. ८ मार्च रोजी दिले. ही संधी साधून भूमाफियांनी वाई बाजार येथील गट क्रमांक २६६, २६७ व २६८ मधील १७ एकर वर्ग २ च्या प्रतिबंधित जमिनीचा विक्री व्यवहार अत्यंत घाई गडबडीत उरकला. याप्रकरणात शासनाला बाजारभावाच्या मूल्यांकनुसार ५० टक्के इतकी रक्कम नजराना म्हणून मिळाली असती. परंतु सदर वर्ग २ च्या जमिनीला ३२ म – ची सनद नसताना सुद्धा मोठ्याआर्थिक देवाणघेवाणीतून व शासन परिपत्राचा आपल्या सोयीनुसार अर्थ लावून प्रस्तुत जमिनीला विक्री परवानगी घेण्याची गरज नसल्याचे आदेश दिल्याचा आरोप तक्रारकर्ता साजिद खान यांनी तक्रारीद्वारे केला आहे. केरोळी या गावानजीक राष्ट्रीय महामार्ग लगत असलेली वर्ग – २ ची जमीन एक करण्यासाठी असेच नियमबाह्य आदेश काढल्यामुळे शासनाचा लाखों रुपयांचा महसूल बुडाला असून तशा जमिनी एक करण्याच्या बाबतीत माहूर तहसीलमध्ये नवीनच पायंडा पाडला जात असल्या बाबत त्यांनी खंत व्यक्त केली आहे.
दरम्यान त्यानुषंगाने अप्पर जिल्हाधिकारी नांदेड यांनी किनवटच्या सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले यांना वस्तुनिष्ठ चौकशी करून स्वयंस्पष्ट अहवाल देण्याचे आदेशित केले आहे