भाजप नांदेड उत्तर जिल्हाध्यक्षपदी अॅड किशोर देशमुख यांची नियुक्ती. सुधाकर भोयर यांना हटविले

प्रतिनिधी/ज्ञानेश्वर गुरनुले

किनवट :- भाजपचे उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर यांना पक्षाने अवघ्या ५ महिन्यात हटविले असून, अर्धापूरचे अॅड. किशोर देशमुख यांची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली आहे.
भाजपच्या संघटनात्मक बांधणीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नांदेड दक्षिण- उत्तर अशी विभागणी केली. त्यात नांदेड उत्तरच्या जिल्हाध्यक्षपदी सुधाकर भोयर यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नियुक्तीने किनवट तालुक्याला पहिल्यांदाच जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली होती. जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्तीनंतर भोयर यांनी उत्तरची जंबो कार्यकारिणीही जाहीर केली होती. विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांना किनवटस्थित बैठकीत नियुक्तीपत्रही दिले. परंतु, भोयर यांची जिल्हाध्यक्षपदावर झालेली नियुक्ती ही स्थानिक आमदार भीमराव केराम यांच्यासह पक्षातील दिग्गजांना खटकली. कार्यकारिणीत

भाजपच्या निष्ठावानांना वगळून स्वतःच्या समर्थकांची
वर्णी लावण्यात येत असल्याचा आरोप भोयर यांच्यावर झाला. आधी नियुक्ती अन् लगेच स्थगिती हाही प्रकार काहींना संशयास्पद वाटला. एकूणच जिल्हाध्यक्ष भोयर व त्यांच्या कार्यकारिणीवर आक्षेप घेत भाजपातील वेगवेगळ्या गटाने भाजप पक्षश्रेष्ठीकडे भोयर विरोधात तक्रारींचा पाऊस पाडला.

वास्तविक भाजपात एखाद्या नियुक्तीनंतर तक्रारींना फारसे गांभीर्याने घेतले जात नाही. परंतु, भोयर यांच्याबाबतीत पक्षातील कार्यकर्त्यांसह नांदेड लोकसभेचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, किनवटचे आमदार भीमराव केराम, अशोक पाटील सूर्यवंशी आदींची नाराजी लपून राहिली नाही. एकंदरीत सर्व तक्रारी व अंतर्गत धुसफुसीमुळे भाजप पक्षश्रेष्ठीने अखेर मंगळवारी दि. २३ रोजी नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर यांना हटवून त्यांची त्यांच्या या पूर्वीच्या पदावर म्हणजेच प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती दिली आहे.

अर्धापूरचे अॅड. किशोर देशमुख यांना उत्तर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. अॅड. किशोर देशमुख हे खासदार चिखलीकर यांचे खंदे समर्थक तर काँग्रेस नेते अशोकराव चव्हाण यांचे कट्टर विरोधक मानले जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *