Nagpur Crime: चहा पिण्याच्या बहाण्याने घरी बोलावून पती-पत्नीच्या वादात ढवळाढवळ का करतो, असे म्हणत व्यक्तीने पोलिस पाटलाचा खून केला. वडिलांना वाचवण्यासाठी गेलेला मुलगाही चाकू हल्ल्यात जखमी हि झालाघटना आज शुक्रवारी (ता.दहा) सकाळी अकरा वाजता तालुक्यातील खुनादपूर येथे घडली.
राजेश नानाजी कोल्हे (वय ५९, रा. खुदानपूर) असे मृताचे नाव असून, ते पोलिस पाटील होते. विजय रामभाऊ खुडसंगे (वय ५०) असे संशयित मारेकऱ्याचे नाव आहे. पोलिस पाटील हे मारेकऱ्याच्या घराशेजारीच राहत होते. विजय खुडसंगे याला दारू पिण्याची सवय होती. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करायचा. पोलिस पाटील व भाऊ या नात्याने ते भांडणात मध्यस्थी करायचे. त्यामुळे खुडसंगे हा दारूच्या नशेत पोलिस पाटील कोल्हे यांच्याशी वाद करायचा व नंतर चांगले बोलून राहायचा. (Nagpur Crime News)
आज शुक्रवारी (ता. दहा) खुडसंगे याने कोल्हे यांना चहा प्यायला घरी बोलावले. लगेच घरातून मला चाकू खुपसला, असा आवाज कोल्हे यांचा मुलगा अनिकेत याला आला. त्याने मित्र प्रफुल्ल भोयर याच्यासह घराकडे धाव घेतली. घराचा लोखंडी जाळीचा दरवाजा आतून लावून होता. लाथ मारून दरवाजा उघडला. अनिकेत याने वडिलांना वाचविण्याचा प्रयत्न केला. खुडसंगे याने मुलावरही चाकूने हल्ला केला. प्रफुल्ल याने मारेकऱ्याच्या हातातून चाकू हिसकावून घेतला. गंभीर जखमी कोल्हे यांना कळंबच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, तपासणी करताच डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी अनिकेत राजेश कोल्हे (वय २२, रा. खुदानपूर) याने कळंब पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून विजय खुडसंगे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. घटनेनंतर मारेकऱ्याला अटक करण्यात आली.
गॅस पेटविण्याची धमकी
खून केल्यानंतर मारेकऱ्याने स्वतःचे घर बंद केले. हातात कुऱ्हाड घेऊन सिलिंडर सुरू केले. सिलिंडरची नळी काढून घेतली. कोणी घरात आल्यास त्याला कुऱ्हाडीने तोडून टाकीन व सिलिंडर पेटवून देईन, अशी धमकी गावकऱ्यांना दिली. पोलिसांनी त्याची समजूत काढली असता, तो दरवाजा उघडण्यास तयार झाला नाही. अखेर पोलिसांनी पायाने दरवाजा तोडत अटक केली.