तालुका/प्रतिनिधी
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यात कर लावल्याने, कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. राज्यातील अनेक भागात कांदा उत्पादक शेतकरी आणि राजकीय पक्षांकडून याचा विरोधत केला जात असून, अनेक ठिकाणी आंदोलने देखील चालू आहेत. कांदा निर्यातीवर जबर कर लावण्यात आल्याने कांद्याचे दर खाली कोसळण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी मागील ३ ते ४ दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली असून, कांदा लिलाव सलग तिसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आला आहे.
निर्यात मुल्य हटवण्याची तसंच सीमेवर आणि बंदरात अडकलेल्या कांद्याची निर्यात होत नाही, तोपर्यंत कांदा लिलाव सुरू करणार नाही, अशी भूमिका कांदा व्यापाऱ्यांनी घेतली आहे.
व्यापाऱ्यांच्या या निर्णयानंतर जिल्ह्यातील मार्केट कमीट्या कठोर कारवाई करण्याच्या तयारीत असून, व्यापाऱ्यांच्या या निर्णयामुळे कांद्याचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता; व्यापाऱ्यांनी आज कांदा लिलाव सुरू न केल्यास बाजार समिती कारवाईच्या नोटीसा बजावणार आहते. तसेच परवाने रद्द करणार असल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
एकट्या लासलगाव बाजार समितीमधील ४० कांदा व्यापाऱ्यांना परवाने रद्द करण्याच्या नोटीसा बजावणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे कांद्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी बैठक बोलवली आहे. सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात भारती पवार यांची बैठक होणार आहे. जिल्हा उपनिबंधक, जिल्हाधिकारी, कांदा व्यापारी तसच नाफेडचे अधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहे. या बैठकीत व्यापाऱ्यांच्या भूमिकेवरही तोडगा काढण्याचा काय प्रयत्न होणार, याकडेच सर्वांच लक्ष लागून आहे. दरम्यान, नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी कांदा विक्री तसेच कांद्याची लिलाव प्रक्रिया बंद पाडल्यामुळे दररोज होणारी कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली झाल्याची माहिती आहे.