अशोक चव्हाणांनी राखला भोकर ‘कृउबा’ समितीचा गड; 18 पैकी 13 जागांवर कॉंग्रेस विजयी.

प्रतिनिधी विकास मेहता

 

नांदेड जिल्ह्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीचा गड माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राखला. भोकर बाजार समितीच्या एकूण 18 जागांपैकी 13 जागांवर काँग्रेसने विजय मिळविला आहे.

तर राष्ट्रवादीला 2 जागा मिळाल्या आहेत. भाजपला 3 जागांवर समाधान मानावे लागले आहे. नांदेड जिल्ह्यातील 4 बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान झाले. त्यानंतर आज (शनिवारी) तीन बाजार समितीची मतमोजणी पार पडली. निकालानुसार काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत.

भोकर ‘कृउबास’ निवडणुकीतील विजयी उमेदवार

नांदेड: भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या निवडणुकीत बीआरएस पक्षाने आपले नशीब आजमावले होते; पण या पक्षाला निवडणुकीत खाते देखील उघडता आले नाही. भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीसोबत नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर आणि कुंटूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर करण्यात आला.

हिमायतनगरमध्ये कॉंग्रेसची बाजी: हिमायतनगर बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपला धोबीपछाड केले आहे. येथे 18 पैकी 18 जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. नायगाव तालुक्यातील कुंटूर बाजार समितीचा निकाल लागला असून 18 जागांवर भाजप आणि काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचे संपूर्ण 18 उमेदवार विजयी ठरले. कुंटूर बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस एकत्र लढल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

उद्या नांदेड ‘कृउबास’चा निकाल: 30 एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यातील सर्वांत मोठी बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल येणार आहे. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे; परंतु आज झालेल्या 3 बाजार समितीच्या निवडणुकीत अशोक चव्हाणांनी गड राखत भाजपला धूळ चारली आहे.

‘मविआ’ची विजयाकडे घोडदौड: अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चारही बाजार समितींमध्ये प्रचार यंत्रणा राबविली गेली. हिमायतनगर बाजार समितीमध्ये काँग्रेसने निर्विवाद यश संपादन केले आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट युतीच्या पॅनलचा काँग्रेसने दारुण पराभव केला तर भोकर कृउबा समितीमध्ये काँगेस-राष्ट्रवादी आघाडीचा पॅनल आघाडीवर आहे. त्या जागेवर काँग्रेसचे सर्वाधिक उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीची विजयाकडे घोडदौड सुरू आहे.

दोन आमदारांची प्रतिष्ठा पणाला: हिमायतनगर येथील निवडणूक विद्यमान आमदार माधवराव जवळगावकर आणि माजी आमदार नागेश अष्टीकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरली होती; परंतु मतदारांनी जळगावकर यांच्या नेतृत्वातील काँग्रेसच्या पॅनलला भरभरून प्रतिसाद देत 18 पैकी 18 उमेदवार विजयी केले आहेत.

कुंटुर बाजार समिती पॅटर्न: नांदेडमध्ये कुंटुर कृषी उत्पन्न समितीत भाजप-काँग्रेसची युती होती. नायगाव तालुक्यातील कुंटुर बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनेलने 17 जागांवर विजयी पताका रोवली. तर एक जागा बिनविरोध निघाली. काँग्रेस-भाजपने एकत्र येत पॅनलच्या नावाखाली निवडणूक लढवली होती. कुंटुर ही नायगांव तालुक्यातील लहान बाजार समिती आहे. येथे 17 जागांकरिता 43 उमेदवार आणि 786 मतदार होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *