तालुका/प्रतिनिधी
किनवट : सारखणी येथील ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे गावातील प्रभाग क्र. २ ,३ आणि ४ मधील परिसरातील नागरिकांचे आरोग्यात धोक्यात आले असून या संबधी वारंवार तक्रार करूनही प्रभारी ग्रामविकास अधिकारी यांचे याकडे पूर्ण दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधुन संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या वस्तीतील काही रहिवाशांच्या घरासमोररील रस्त्यावरून घाण पाणी वाहत असल्याने दुर्गंधी पसरली असून या रस्त्यावरून जि.प. शाळेतील लहान मुले, बालके शाळेत जात असून नाक बंद करून या रोडने जातात. ही बाब ग्रामसेवक, सरपंच,ग्रामपंचायत सदस्याच्या लक्षात आणून दिली तरीही अद्याप कोणीहि लक्ष द्यायला तयार नाही. प्रभाग क्र. २ असो की प्रभाग क्रमांक ४ असुध्या या घाणीच्या साम्राज्यामुळे हिरानगर, गौतम नगर मधील लहान मुलांना डेंग्यू झाल्याने उपचार घेत आहेत. या घाण पाण्यामुळे अजूनही रोगराईचे प्रमाण वाढणार असल्याचे दिसून येते.
या बाबीला ग्रामपंचायतीला गांभिर्याने घेवून हा प्रश्न सोडवेल का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. सरपंच, ग्रामसेवक यांना याबाबत कल्पना देऊनही त्यांनी आजपर्यंत उपाययोजना केली नाही तसेच साधी औषधाची फवारणी फवारणी करण्याचे सौजन्यहि ग्रामपंचायत दाखवत नाही असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेग्रामपंचायतीने ताबडतोब रस्त्यावरून वाहणाऱ्या घाण पाण्याची व्यवस्था न केल्यास ग्राम पंचायतीसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष देऊन तात्काळ यावर उपाययोजना करावी अशी या प्रभागामधील नागरिकाची मागणी आहे.